Saturday, 27 October 2012

अष्टविनायका तुझा महिमा कसा

भारतात जशी शंकराची बारा ज्योतिर्लिंगे प्रसिद्ध आहेत तसेच महाराष्ट्रातील अष्टविनायक भाविकांच्या मनात एक वेगळेच स्थान मिळवून आहेत. हिंदू धर्मात कोणतेही कार्य करण्याअगोदर गणेशाला वंदन करूनच सुरू केले जाते. तो विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता आणि मंगलमूर्ती आहे. त्यामुळेच कोणत्याही छोट्या मोठ्या गावांत जा, तेथे गणपती मंदिर असणारच. देशात कांही गणपती मंदिरे वैशिष्ठ्यूपूर्णही आहेत मात्र अष्टविनायकानी आपले एक वेगळेच महत्त्व सिद्ध केले आहे. हे अष्टविनायक स्वयंभू आहेत म्हणजे या मूर्ती निसर्गानेच निर्माण केलेल्या आहेत असा समज आहे तसेच हे सर्व विनायक जागृत म्हणजे भाविकांना पावणारे आहेत असाही विश्वास भाविकांत आहे. अष्टविनायकांची ही स्थाने महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि रायगड अशा तीन जिल्ह्यातच आहेत. अनेक भाविक अष्टविनायकाची यात्रा करत असतात. मात्र या यात्रेचे कांही नियम आहेत. त्यानुसार मोरगांवच्या मयुरेश्वराचे प्रथम दर्शन घ्यावे लागते. त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगांव व परत मोरगांव अशा क्रमाने ही यात्रा केली तरच ती शास्त्रशुद्ध होते.


मोरगांवचा मयुरेश्वर-
अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर. पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील कर्‍हा नदीच्या काठी वसलेल्या मोरगांव या छोट्याशा गावांत हे मंदिर असून दूरून एखाद्या किल्ल्याप्रमाणे हे मंदिर दिसते. मयुरेश्वर म्हणजे मोरावर आरूढ झालेला. गणपतीचे वाहन मूषक असले तरी हा गणपती मोरावर विराजमान आहे. तीन डोळे असलेली ही मूर्ती बैठी असून डाव्या सोंडेची आहे. गणपतीच्या डोळ्यात व नाभीत मौल्यवान रत्ने बसविलेली आहेत. डोक्यावर नागराजाची फडा आहे. दोन्ही बाजूस रिद्धी सिद्धींच्या मूर्ती आहेत. मूर्तीवर शेंदूराचे कवच असल्याने मूर्ती मोठी वाटली तरी प्रत्यक्षात छोटी आहे. दर १००-१५० वर्षांची हे कवच निघते.

मंदिरात मुख्य दाराने प्रवेश केला की प्रथम भव्य दिपमाळ आहे, नगारखाना आहे. मंदिरात गेल्यावर दिसतो दगडी मूषक किवा उंदीर. याने पुढच्या दोन पायात लाडू पकडलेला आहे. पायर्‍या चढून वर गेल्यानंतर दिसतो भव्य नंदी. असे सांगतात की येथून जवळच असलेल्या शिवमंदिरात नेण्यासाठी हा नंदी बैलगाडीतून नेला जात होता मात्र मयुरेश्वराच्या मंदिरासमोर आल्यावर गाडी मोडली आणि नंदी खाली पडला. त्यानंतर अनेक जणांनी उचलूनही हा नंदी हलेनाच. रात्री गाडीवानाच्या स्वप्नात हा नंदी आला आणि त्याने याच मंदिरात त्याला राहायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे गणपतीमंदिरातच नंदी बसविण्यात आला.

हे मंदिर बिदरच्या बादशहाच्या दरबारात असलेले सरदार गोळे यांनी बांधल्याचे दाखले आहेत. मात्र मोगली आक्रमणापासून सुरक्षा मिळावी म्हणून दूरून मशिदीचा भास व्हावा अशा पद्धतीने हे मंदिर बांधले गेले आहे. मंदिराला चार दरवाजे असून पूर्व दरवाजात लक्ष्मीनारायण, पश्चिम दरवाज्यात रती आणि काम, दक्षिण दरवाजात शिवपार्वती तर उत्तरेच्या दरवाजात पृथ्वी आणि सूर्य आहेत. मंदिराच्या आठ कोपर्‍यात आठ गणपती असून ते एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विघ्नराज, धुम्रवर्ण, वक्रतुंड या स्वभाववैशिष्ट्यांनी युक्त आहेत. मंदिरात शमी, मंदार आणि तराटीचा वृक्ष असून तराटीला कल्पवृक्ष असेही म्हटले जाते. याच झाडाखाली बसून ध्यानधारणा केली जाते. मयुरेश्वराचे दर्शन घेण्याअगोदर नंगा भैरव दर्शन घेण्याची प्रथा असून मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या या भैरवाला गुळ, नारळाचा नैवैद्य दाखविला जातो.

पुण्यापासून ५५ किमीवर असलेल्या मोरगांवात पूर्वी मोर मोठ्या संख्येने होते असे सांगतात तसेच या गणपतीची मूर्ती प्रत्यक्ष बह्माने बसविली होती असाही समज आहे. सध्याच्या मूर्तीमागे तांब्याच्या कवचात वाळू, लोखंड आणि हिरे यांच्या चूर्णातून बनविलेली मूर्ती पांडवांनी बसविलेली आहे असेही सांगितले जाते.



स्वस्ती श्री गणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धीद्म्
बल्लाळम् मुरुडम् विनायक महडम् चिंतामणीम् थेवरम्
लेण्याद्रीम् गिरीजात्मजम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम्
ग्रामो रांजण संस्थितो गणपती: कुर्यात सदा मंगलम्
कुर्यात सदा मंगलम्

जय गनपती गुनपती गजवदना (२)
आज तुझी पुंजा देवा गौरीनंदना
जय गनपती गुनपती गजवदना

कुडी झाली देऊळ छान, काळजात सिंहासन
काळजात सिंहासन
मधोमधी गजानन
दोहीकडी रिद्धीसिद्धी उभ्या ललना
जय गनपती गुनपती गजवदना

अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
अष्टविनायका तुझा महिमा कसा

गनपती, पहिला गनपती, आहा
मोरगावचा मोरेश्वर लई मोठ मंदिर
[अकरा पायरी हो, अकरा पायरी हो ]
नंदी कासव सभा मंडपी नक्षी सुंदर
[शोभा साजरी हो, हो शोभा साजरी हो]

मोरया गोसाव्यानं याचा घेतला वसा .१

गनपती, दुसरा गनपती, आहा
थेऊर गावचा चिंतामनी
कहाणी त्याची लई लई जुनी
काय सांगू, आता काय सांगू
डाव्या सोंडेच नवाल केल सार्‍यांनी, हो सार्‍यांनी
विस्तार ह्याचा केला थोरल्या पेशवांनी, हो पेशव्यांनी
रमाबाईला अमर केल वृंदावनी, हो वृंदावनी
जो चिंता हरतो जगातली त्यो चिंतामनी

भगताच्या मनी त्याचा अजुनी ठसा ..२

ग न प ती, तिसरा ग न प ती
ग न प ती, तिसरा ग न प ती
शिद्दीविनायक तुझा शिद्दटेक गाव रं
पायावरी डोई तुज्या भगताला पाव रं
दैत्य मधु-कैतभान गांजल हे नग्गर
ईस्नुनारायन गाई गनपतीचा मंतर
राकुस म्येल नवाल झाल
ट्येकावरी देऊळ आलं
लांबरुंद गाभार्‍याला पितळंच मखर
चंद्र सुर्य गरुडाची भवती कलाकुसर

मंडपात आरतीला खुशाल बसा ...३

गणपती, गणपती गं चवथा गणपती
बाई, रांजणगावचा देव महागणपती
[बाई, रांजणगावचा देव महागणपती]
दहा तोंड ईस हात जणु मुर्तीला म्हणतीबाई,
[दहा तोंड ईस हात जणु मुर्तीला म्हणती]
बाई, रांजणगावचा देव महागणपती
गजा घालितो आसन, डोळं भरुन दर्शन
सुर्य फेकी मुर्तीवर येळ साधुन किरण
किती गुणगान गाव, किती करावी गणती
बाई, रांजणगावचा देव महागणपती

पुण्याईच दान घ्याव ओंजळ पसा ....४

गणपती पाचवा, पाचवा गणपती
ओझरचा विघ्नेश्वर, बाई ओझरचा विघ्नेश्वर
लांबरुंद हाये मुर्ती
जडजवाहिर त्यात
काय सांगू शिरीमंती
ओझरचा विघ्नेश्वर, बाई ओझरचा विघ्नेश्वर
डोळ्यामंदी मानक हो, बाई डोळ्यामंदी मानक हो
हिरा शोभतो कपाळा
तानभुक हारते हो, सारा पाहुन सोहाळा
चारी बाजु तटबंदी
मधे गनाच मंदिर
ओझरचा विघ्नेश्वर

ईघ्नहारी, ईघ्नहर्ता स्वयम्भू जसा .....५

गनपती, सहावा गनपती
(हो....हो...)
लेण्याद्री डोंगरावरी
नदीच्या तीरी, गणाची स्वारी
तयाला गिरीजत्मज हे नाव
दगडामंदी कोरलाय भक्तीभाव
रमती ईथे रंकासंगती राव हो जी जी
(रमती ईथे रंकासंगती राव हो जी जी..)

शिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला हो जी जी
(शिवाचा झाला हो जी जी, शिवाचा झाला हो जी जी)
लेन्याद्री गनानं फाटे आशीर्वाद केला हो जी जी
(आशीर्वाद केला हो जी जी, आशीर्वाद केला हो जी जी)
पुत्रानं पित्याला जल्माचा परसाद द्येला हो जी जी
(परसाद द्येला हो जी जी, परसाद द्येला हो जी जी)
किरपेनं गनाच्या शिवबा धावूनी आला हो जी जी
(धावूनी आला हो जी जी, धावूनी आला हो जी जी)

खडकात केल खोदकाम
दगडाच मंदपी खांब
वाघ, शिंव, हत्ती लई मोटं
दगडात भव्य मुखवट

गनेश माजा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
अन् गिरीत्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
(जी जी हो जी जी, हं जी जी रं जी जी, हे हे हे हां)

अहो दगडमाती रुप द्येवाच लेण्याद्री जसा ......६

सातवा गनपती राया, सातवा गनपती राया, सातवा गनपती राया हे हे हे हे हे हो हा
महडगावं अति महाशूर
वरदविनायकाच तिथं येक मंदिर
मंदिर लई सादसुद, जस कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी
नक्षी नागाची कळसच्या वर, कळसाच्या वर....
(हे हे हे हे हां)

स्वप्नात भक्ताला कळ
देवच्या माग हाय तळ
मुर्ती गनाची पाण्यात मिळ
त्यान बांधल तिथ देऊळ

दगडी महिरप सिंहासनी या, प्रसन्न मंगल मुर्ती हो
वरदानाला विनायकाची पुजा कराया येती हो जी जी रं जी
(माज्या गना र जी जी, माज्या गना र जी जी)
हे हे हे हे हे हो हा

चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा, अहो चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा .......७

आठवा आठवा गणपती आठवा
गणपती आठवा हो गणपती आठवा
पाली गावच्या बल्लाळेश्वरा
आदीदेव तू बुध्दीसागरा
स्वयंभू मुर्ती पुर्वाभिमुख
सुर्यनारायण करी कौतुक
डाव्या सोंडेचे रुप साजीरे
कपाळ विशाळ, डोळ्यात हिरे
चिरेबंद ह्या भक्कम भिंती
देवाच्या भक्तीला कशाची भिती
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा ........८

अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
(हो, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा)

मोरया मोरया मंगलमुर्ती मोरया
मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया
मोरया मोरया चिंतामणी मोरया
मोरया मोरया सिध्दीविनायक मोरया
मोरया मोरया महागणपती मोरया
मोरया मोरया विघेश्वरा मोरया
मोरया मोरया गिरीजत्मजा मोरया
मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया
मोरया मोरया अष्टविनायक मोरया
मोरया मोरया अष्टविनायक मोरया
गायक/गायिका:
जयवंत कुळकर्णी, अनुराधा पौडवाल, शरद जांभेकर, चंद्रशेखर गाडगीळ आणि इतर
संगीतकार:
अनिल -अरुण
गीतकार:
जगदीश खेबुडकर
चित्रपट:
अष्टविनायक
अधिक टिपा:
प्रत्येक कडव्यातील कलाकारः मोरगावः कृष्णकांत दळवी थेऊरः चंद्रकांत सिध्दटेकः अशोक सराफ रांजणगावः उषा चव्हाण ओझरः आशा काळे लेण्याद्री: सुधीर दळवी महडः रविंद्र महाजनी पाली: शाहू मोडक, जयश्री गडकर

मोरेश्वर | मोरगाव


ह्या देवळाच्या सभोवताली त्याच्या संरक्षणार्थ पक्का तट बांधण्यात आलेला आहे. जमिनीपासूण ह्या तटाची उंची जवळजवळ पन्नास फूट असावी. चार दिशेला चारी कोपऱ्यात मिनारासारखे चार स्तंभ उभे असलेले आढळतात. मोरगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे, हे गाणप्य सांप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. ह्या पुण्यक्षेत्राबद्दल गणेशपुराणात बरीच महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. ह्या क्षेत्राचे प्राचीन नाव, ‘भूस्वानंदभुवन’. ह्या गावात मोरांबी वस्ती अगदी भरपूर आहे. म्हणूनच ह्या गावाला मोरगाव असे नाव पडले असावे. आणि मोरम्हणजे मयूर, म्हणून इथला देव मयुरेश्वर. ह्या मंदिराचे तोंड उत्तरेकडे आहे. मंदिर उंचवट्यावर असल्यामुळे मंदिरात शिरण्यापूर्वी पायऱ्या चढाव्या लागतात. प्राकाराबाहेर पायऱ्या चढण्यापूर्वी नगारखाना आहे. आणि नगारखान्याच्या खालच्या बाजूला, आपल्या पुढल्या दोनपायांत लाडू धरलेला उंदीर उभा आहे. त्याच्यापुढे पंधरा फूट उंचीवर दगडी चौथऱ्यावर नंदी बसलेला आहे. त्या दगडी चौथऱ्यापुढे दहा-बारा फूट अंतरावर मुख्य मंदिर आहे. त्याचा प्राकार दुसऱ्या एका चौथऱ्यावर आहे. ह्या चौथऱ्यावर सभामंडप आहे आणि सभामंडपला लागून, पूर्वेकडे देवाचे शेजघर आहे. सभामंडपाचे पूर्वेला आवारामध्ये एक शमीचे आणि एक बिल्वदलाचे झाड आहे. पश्चिम दिशेला कल्पवृक्ष आहे. दर्शनाला आलेले भक्तजन याच वृक्षाला बसून अनुष्ठान करीत असतात.
मोरया गोसावी यांनी सुद्धा याच वृक्षाखाली तपश्चर्या केली. तटाच्या आतल्या बाजूला चौकाच्या आठ कोपऱ्यांवर श्रीगणेशाच्या आठ प्रतिमा बसविलेल्या आहेत. तेवीस परिवार मूर्ती नवीन करून घेतलेल्या आहेत. आणि त्या मंदिरात सर्वत्र बसविलेल्या आहेत. सभामंडपानंतर मुख्य गाभारा लागतो. गाभाऱ्यातील श्री मोरेश्वराची मूर्ती अत्यंत रमणीय आशी आहे. मूर्तीच्या डोळ्यांत आणि बेंबीमध्ये हिरे बसविलेले आहेत. मूर्तीच्या डोक्यावर नागाची फणा आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सिद्धी बुद्धीच्या मूर्ती उभ्या आहेत. त्या पितळेच्या आहेत. मोरेश्वराची मूर्ती भव्य आणि रेखीव अशी आहे. असे म्हणतात की ही मूर्ती मूळची नव्हे. खरी मूर्ती रत्नांचा चुरा, लोह आणि माती यांनी बनलेलि असून ती दृश्य मूर्तीच्या मागच्या बाजूला ठेवण्यात आलेली आहे. मूळ मूर्तीची स्थापना स्वतःअ ब्रह्मदेवानेच केली होती. पुढे पांडव तीर्थयात्रा करीत करीत येथे आले असताना त्यांनी मूळ मूर्तीला कुणाचा धक्का लागू नये म्हणून तिला तांब्याच्या पत्र्याने बंदिस्त करून ठेवली. आणि हल्लीची मूती नित्यपूजेसाठी स्थापन करण्यात आली. मोरया गोसावी यांचा जन्म याच क्षेत्रात झाला. एक दिवस, ब्रह्मकमंडलू-तीर्थात स्नान करीत असताना त्यांना गणेशाची मूर्ती सापडली ह्या क्षेत्रामध्येच त्यांनी उग्र तपश्चर्या केली आणि सिद्धी प्राप्त करून घेतली. श्रीरावेशाच्या आज्ञेवरूनच आपल्याला कुंडात सापडलेली मूर्ती चिंचवड येथे नेली. आणि तेथे त्या मूर्तीची स्थापना केली. आणि चिंचवडला येऊन राहिले होते. तरीसुद्धा प्रत्येक शुद्ध चतुर्थीला ते मोरगावची वारी करायला कधीही चुकत नसत. शेवटी पवनाकाठी त्यांनी जिवंत समाधी घेतली. ह्या मोरेश्वराविषयी, पुराणात काही माहिती दिलेली आहे. कोणे एकेकाळी चक्रपाणी ह्या नावाचा एक राजा मिथिल देशात भंडकी नगरीत होऊन गेला. त्याला सिंधू नावाचा पुत्र झाला. त्या सिंधूने उग्र तपश्चर्या केली आणि सूर्यनारायणाकडून अमरपदाची प्राप्ती करून घ्तली. त्यामुळे तो उन्मत्त झाला. आणि त्याने सर्व देवांना जिंकले आणि त्यांना छळ आरंभला. सर्व देव एकत्र झाले आणि श्री विष्णूला शरण गेले. श्री विष्णूने त्या सिंधूशी युद्ध सुरू केले. परंतु त्या युद्धात विष्णूचा पराभव झाला. आणि त्यामुळे देवांचा छळ तसाच चालू राहिला. सर्व देव आता श्रीगजाननाला शरण गेले. श्रीगजाननाची त्यांनी प्रार्थना केली. श्रीगजाननाने पार्वतीच्या पोटी अवतार घेतला. आणि मोरावर बसून त्याने सिंधूशी युद्ध केले. युद्धात सिंधूचा वध केला. तेव्हापासून मोरगावच्या गजाननाचे नाव मयुरेश्वर आथवा मोरेश्वर असे पडले. ज्याची इच्छा धरावी, ती गोष्ट हा मोरया देतो अशी याची ख्याती आहे. मोरया मोरया मी बाळ तान्हे । तुझीच सेवा करु काय जाण । अन्याय माझे कोट्यानुकोटी । मोरेश्वरा बा तू घाल पोटी ॥ कऱ्हेचे तिरी एकसे मोरगावू । तिथे नांदतो मोरया जाण पाहू । चला जाऊ यात्रे महापुण्य आहे । मनी इच्छिले मोरया देत आहे ॥

श्री चिंतामणी



श्री चिंतामणी- थेऊर, जि. पुणे मार्ग- पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासुन २२ कि.मी. अंतरावर. लोणी स्थानकापासून ५ कि.मी. यात्रा- भाद्रपद शु. चतुर्थी. रमा-माधव पुण्यतिथी. कार्तिक कृष्ण अष्टमी. मूर्ती- स्वयंभू. उजव्या सोंडेची. मंदिर- महाद्वार उत्तराभिमुख पण मूर्ती पूर्वाभिमुख. प्रशस्त आवार. विस्तृत सभामंडप. तिन्ही बाजूंनी मुळा-मुठेचा वेढा. या मंदिराची व्यवस्था चिंचवड देवस्थानाकडे आहे. इतिहास- मोरया गोसावी यांनी इथेही तप केले. इथेच त्यांना सिद्धी मिळाली. त्यामुळे चिंचवड व थेऊर यांचा परस्पर संबंध आहे. मोरया गोसाव्यांचे पुत्र चिंतामणी देव यांनी इथले मंदिर बांधले. सभामंडप श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला. त्यांचे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई ह्यांचे हे आवडते स्थान होते. श्रीमंत माधवराव पेशव्यांचा मृत्यूही याच क्षेत्रात झाला. मंदिर परिसरातीलच एका ओवरीत, त्या चिंतामणीच्या सान्निध्यात त्यांचा तो अखेरच्या काळातील मुक्काम होता. एकीकडे अनेक वैद्यांचे उपचार सुरू होते, तर दुसरीकडे अभिषेकाची ती अखंड संततधारही चालू होती. गजाननाचा धावा करत अनुष्ठान जप तपास बसलेल्या ब्राह्मणांचा मंत्रोच्चार टिपेच्या स्वरात पोहोचला होता. एवढय़ात.. अभिषेकाची ती धार तुटली आणि तिकडे तो गजाननाचा धावाही! मराठेशाहीचा शूर-कर्तबगार पेशवा अगदी अकाली त्या चिंतामणीच्या पायी चिरनिद्राधीन झाला. श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या जीवनकार्यातील हा अखेरचा प्रसंग! ज्याने आमच्या कर्तबगार, शूर मराठेशाहीला काहीसे भावुक केले आणि अष्टविनायकातील थेऊरलाही एक नवी ऐतिहासिक ओळख बहाल केली. पुण्याहून थेऊर बावीस किलोमीटर. गावापर्यंत पुण्याची शहर बससेवा सतत धावते. निवांत स्थळ, धार्मिक वलय आणि ऐतिहासिक पाश्र्वभूमीने थेऊरला पर्यटक, भाविकांची सतत वर्दळ असते. तीन बाजूने वेढा पडलेल्या मुळा-मुठेच्या कवेत हे छोटेसे गाव वसलेले आहे. गावात आपण येतो तेच चिंतामणीच्या दारात. कधीकाळी हरिपंत फडक्यांनी बांधलेला फरसबंदी मार्गच आजही आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन येतो. मंदिराभोवती तट आहे. या तटातील उत्तराभिमुखी दरवाजातून मंदिर आवारात आपला प्रवेश होतो. चिरेबंदी बांधणीतले मंदिर, पुढय़ात लाकडी, कौलारू सभामंडप आणि मंदिराभोवती तटाला लागून ओवऱ्या अशी या मंदिराची रचना. पैकी मूळ मंदिर मोरया गोसावी यांच्या कुळातील चिंतामणी महाराज देव यांनी चाळीस हजार रुपये खर्चून बांधले. पुढचा लाकडी सभामंडप माधवराव पेशव्यांनी उभारला. मंदिराच्या दारातच एक भलीमोठी घंटा टांगलेली आहे. चिमाजीअप्पांनी वसई विजयोत्सवाची प्रतीके म्हणून लुटून आणलेल्या पोर्तुगिजांच्या घंटांपैकी ही एक. या घंटेवर काही इंग्रजी अक्षरेही दिसतात, पण त्याचा अर्थ लागत नाही. हौसेने ही घंटा वाजवायची आणि सभामंडपात शिरायचे. पेशव्यांनी बांधलेला हा कौलारू-लाकडी सभामंडप आजही सुस्थितीत आहे. या मंडपाच्या मधोमध कारंज्याचा एक हौद आहे. हे कारंजे सध्या बंद आहे. ते सुरू करता आले तर त्याच्या शब्दातील सौंदर्य खऱ्याअर्थाने उमलून येईल. सभामंडपात आल्याबरोबर समोर गाभाऱ्यातील पूर्वाभिमुख डाव्या सोंडेची आसनस्थ चिंतामणीची प्रसन्न मूर्ती दर्शन देते. शेंदूरभारल्या मूर्तीच्या भाळी असलेले ते जास्वंदीचे फूल आणि दूर्वाची जुडी त्याच्या सौंदर्यात भर घालत असते. त्याचे ते क्षणभराचे दर्शनही मन प्रसन्न करून जाते. रमा-माधव स्मृती चिंतामणीचे हे प्रसन्न दर्शन घेऊन भोवताली फिरू लागलो, की तिथल्याच एका ओवरीत ठेवलेली माधवराव पेशव्यांची प्रतिमा थेऊरभोवती घडलेल्या त्या इतिहासात घेऊन जाते. थोरले माधवराव पेशवे यांची थेऊरच्या चिंतामणीवर मोठी भक्ती होती. ते इथे वारंवार दर्शनास येत. यातूनच चिंतामणीचा नित्य सहवास घडावा म्हणून त्यांनी थेऊर गावात स्वत:साठी एक टोलेजंग वाडा बांधून घेतला. तट, बुरूज, महादरवाजा, नगारखाना असलेला हा वाडा अद्याप थेऊर गावात पाहता येतो. येथील यशवंत साखर कारखान्यातर्फे याची निगा राखली जाते. वाडय़ाच्या आतील वास्तू ढासळल्या असल्या तरी तेथील जोत्यावरून त्या वेळेच्या बांधकामाची कल्पना येते. आपल्या अखेरच्या आजारपणातही माधवराव पेशव्यांनी चिंतामणीवरची ही श्रद्धा न सोडता स्वत:ला त्याच्याच हवाली केले. अखेर त्याचाच धावा करत १८ नोव्हेंबर १७७२ रोजी त्यांनी आपला प्राण इथे चिंतामणीच्या दारी सोडला. सारी मराठेशाही दु:खात बुडाली. इथे मुळा-मुठा नदीच्या काठावरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पत्नी रमाबाईदेखील सती गेल्या. मुळा-मुठेच्या काठावरचे हे वृंदावन रमा-माधवरावांच्या या हृद्य आठवणी आजही कवटाळून आहे. दरवर्षी कार्तिक वद्य अष्टमीला इथे माधवराव-रमाबाईंच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होतो. थेऊरला यावे. इथल्या चिंतामणीचे प्रसन्न दर्शन घ्यावे. बरोबरीने हा इतिहास पाहावा. जमले तर जुन्या थेऊरमधील लक्ष्मी आणि महादेवाची प्राचीन मंदिरे पाहावीत. इथला साखर कारखाना बघावा. इथले गोड पेरू खावेत आणि आपल्या मुशाफिरीच्या आठवणीत आणखी एक स्थळ जोडावे.

बल्लाळेश्वर | पाली

श्रीबल्लाळेश्वराचे देऊळ फारच मनोहर आहे. त्याचे तोंड पूर्व दिशेला आहे. त्यामुळे सूर्वोदय होताच सूर्याची कोवळी सोनेरी किरणे बरोबर देवाच्या मूर्तीवर पडतात. त्यावेळी तिथले वातावरण अगदी पवित्र आणि प्रसन्न असे एखाद्या नास्तिकालाही वाटते. मंदिराचे बांधकाम अगदी चिरेबंदी आहे. शिशाचा रस ओतून भिंती अगदी मजबूत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे बांधकाम एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणेच झालेले आहे. मंदिराचा मुख्य गाभारा पंधरा फूट उंच आहे. तो उंदीर गणपतीकडे पहाणारा आहे.




 मंदिराबाहेरच्चा सभामंडप चाळीस फूट लांबीचा आणि वीस पूट रुंदीचा आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये नक्षीकाम केलेले अगदी मखर आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला दोन तलाव आहेत. त्यावर घाट बांधलेले आहेत. तलाव सदोदित पाण्याने भरलेले असतात. परंतु तलावातले पाणी मात्र स्वच्छ नाही आणि पिण्याजोगे तर बिलकूल नाही. बाहेरच्या कमानीत एक मोठी थोरली घंटा आहे. ती पाहिल्यावर नाशिकच्या नारोशंकरी घंटेची आठवण होते. ही घंटा चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसईचा किल्ला जिंकला त्यावेळी जी लुटालुट झाली, त्यात मिळाली आणि ती मग पेशव्यांनी ह्या देवस्थानाला अर्पण केली असे म्हणतात. मोरोबा दादा फडणीस यांचे वडील बाबुराव फडणीस यांनी हे देवालय बांधले आणि त्यासाठी नेमणूक करून दिली. त्याचवेळी त्यांनी धर्मशाळा आणि मठही बांधला. जागृत देवस्थान म्हणून ह्या देवस्थानाची फार ख्याती आहे. जुन्या काळू ह्या देवालानवसाचे आततायी प्रकार केले जात असे म्हणतात. त्या प्रकारापैकी आपली जाभ कापून देवाला अर्पण करण्याचा एक प्रकार होता. अशी एक घटना १७४४/४५ साली पडल्याची नोंद इतिहासात सापडते. ती खबर केली आणि मंदिराची शुद्धि करून घेतली. १७५३/५४ साली खुद्द पेशव्यांनी श्रीबल्लाळेश्वरावर अभिषेक केला व अनुष्ठान करविले. ह्याबाबत ऐतिहासिक पेशवे दप्तरात एक नोंद आढळून येते. गाभाऱ्यात श्रीबल्लाळ विनायकाची मूर्ती आहे. तिची उंची तीन फूट आहे. कपाळाचा भाग खोलगट तर बाकीचा चेहरा स्पष्ट असा आहे. सोंड डावीकडे वळलेली आहे. बेंबीमध्ये आणि डोळ्यांमध्ये दैदिप्यमान हिरे बसविलेले आहेत. देवाची मूर्ती दगडी सिंहासनावर विराजमान झालेली आहे. सिंहासन मूर्तीच्या सभोवती जडविलेले आहे. मूर्तीच्या बेंबीपासूनचा भाग सिंहासनाच्यावर दिसून येतो. देवाच्या जवळ ऋद्धिसिद्धि उभ्या आहेत. कृपयुगामध्ये पल्लीपूर ह्या नगरात, कल्याणशेट ह्या नावाचा एक व्यापारी रहात असे. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. पोटी मूलबाळ नसल्यमुळे इंदुमतीने श्रीगणपतीची उपासना सुरू केली. काहीकाळाने, तिला दिवस गेले. आणि तिला मुलगा झाला. त्या आपल्या मुलाचे नाव तिने ‘बल्लाळ’ ठेवले. बल्लाळ लहानाचा मोठा होऊ लागला. परंतु त्याला श्रीगणपतीच्या चिंतनावाचून दुसरे काहीच सूचत नव्हते. रात्रंदिवस तॊ आपल्या देवाचे चिंतन करीत राहिला. त्याच्या संगतीत राहिलेली गावातली मुलेही श्रीगणपतीची उपासना करू लागली. ती मुलेसुद्धा सदोदित गणपतीचे चिंतन करीत राहिली. मग काय? बल्लळाची संगत धरल्यामुळे गावातील मुले बिघडून गेली अशी ओरड सुरू झाली. त्या मुलांच्या पलकांनी बल्लाळच्या पित्याजवळ आपली तक्रार निवेदन केली. कल्याणशेटी आपल्या मुलाला रागे भरला. त्याने बल्लाळच्या पुढ्यातली मूर्ती उथळून टाकली आणि त्याला भरपूर मार दिला. “तू असा वेडेपणा करू नकोस आणि गावातल्या मुलांना बिघडवू नकोस” असाही त्याला दम दिला. बेदम मार खाल्ल्यामुळे, बल्लाळ बेशुद्ध झाला. श्रीगणपती हे त्याचे दैवत. त्याच्या दैवताला दया आली. दैवत प्रसन्न झाले आणि अक्ताला अभय दिले. बल्लाळला पावलेला हा गणपती म्हणून बल्लाळेश्वर. ह्याच देवळाच्या मागच्या बाजूला दुसरे एक देऊळ आहे. ते श्रीधुंडीविनायकाचे देऊळ म्हणून प्रख्यात आहे. श्रीधुंडीविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. पूर्वी बाळबल्लाळ हा रानात, एका गणपतीच्या मूर्तीच्या भजनपूजनात निमग्न असताना त्याचे पिताजी कल्याणशेटी तेथे आले. आणि त्यांनी त्याच्या पुढ्यातली मूर्ती उधळून लावली. जी मूर्ती उधळून लावली तीच ही मूर्ती होय. श्रीधुंडीविनायकाची कथा ही अशी आहे. दर्शन आणि पूजा अर्चा करताना, प्रथम ह्या श्रीधुंडीविनायकाला अग्रमान दिला जातो. आणि नंतर श्रीबल्लाळेश्वराचे दर्शन वगैरे, अशी प्रथा आहे.

थेऊरचा चिंतामणी


चिंतामणी (थेउर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातला पाचवा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी. इतिहास गणपतीचे मंदिर हे धरानिधर महाराज देव यांनी बांधले. 100 वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणेलाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला 40 हजार रूपये लागले होते.युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या 2 मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या 27 वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्या‍त आले. या गणपती समोरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथेच सिध्दी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.
आख्यायिका थेऊरच्या गणपती हे अष्टविनायकापैकी तिसरे स्थान.या स्थानाला कशामुळे महत्त्वाला आले यासंबंधीच्या तीन कथा आहेत. त्यापैकी एक खाली देत आहोत. ऋषिपत्नी अहल्येशी कपटाचरण करून निंद्य कर्म केल्याबद्दल गौतम मुनींनी इंद्राला सर्वांगाला क्षते पडतील, असा शाप दिला. तेव्हा इंद्राने ऋषींचे पाय धरून क्षमा मागितली. ऋषींनी मग त्याला श्रीगणेशाची षडक्षरी मंत्राने तपःपूत होऊन आराधना करून शापाच्या परिणामातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवून दिला. इंद्राने ज्या स्थानी ही तपश्‍चर्या करून शुद्धी व मुक्ती मिळविली आणि तो चिंतामुक्त झाला त्या स्थानी श्रीगणेशाची स्थापना करून तिथल्या सरोवराला चिंतामणी असे नाव दिले. येथे अनुष्ठान करणाऱ्या साधकाच्या चित्ताला शांती आणि स्थिरता प्राप्त व्हावी असा या क्षेत्राचा महिमा आहे. चिंचवडचे मोरया गोसावी यांनी या थेऊरच्याच अरण्यात उग्र तपश्‍चर्या केली होती मोरया गोसावींना याच ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली. थेऊर क्षेत्राला फार महत्त्व आले ते थोरले बाजीराव पेशवे व त्यांच्या साध्वी पत्नी रमाबाई यांच्या सान्निध्यामुळे. माधवराव पेशवे यांची श्रीचिंतामणीवर विलक्षण भक्ती होती. मनःस्वास्थ्य आणि शरीरस्वास्थ्य साधण्याकरिता ते या ठिकाणी येऊन राहत.त्यांनी श्रीचिंतामणीच्या सहवासातच राहून शेवटी आपले प्राण देवाच्या चरणी सोडले आणि लागलीच रमाबाईसाहेब पतीबरोबर तेथेच सती गेल्या. त्या जागी आज सतीचे वृंदावन आहे. मंदिराचा महादरवाजा उत्तर दिशेला असून मंदिर भव्य आहे. चिंचवडचे श्री. चिंतामणी देव यांनी हे गणपती मंदिर बांधले. त्यानंतर थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सभामंडप बांधला. बाजूच्या मुळामुठा नदीच्या डोहाला चिंतामणीतीर्थ असे म्हणतात. येथील श्रींचिंतामणींची मूर्ती डाव्या सोंडेची असून, पूर्वाभिमुख आहे. मांडी घातलेले आसन आहे. थेऊर गाव चिंतामणीस इनाम आहे. सदर देवस्थान चिंचवड संस्थानच्या ताब्यात आहे. थेऊरचे माहात्म्य ऐतिहासिक काळापासून चालत आले आहे. ही सगळी जागृत देवस्थाने मोगलांच्या स्वाऱ्यात विच्छिन्न झालेली आढळतात. कसे जावे पुणे ते थेट थेऊर पी.एम.टी. बसेस सारख्या चालू असतात. हे अंतर २५ किलोमीटर आहे. पुणे ते लोणी रेल्वेने किंवा एस.टी.ने गेल्यावर तेथून थेऊर ७ किलोमीटर आहे. पुणे- सोलापूर रस्त्यावर लोणीजवळ डाव्या हातास थेऊरचा फाटा आहे. पुणे- हडपसर- लोणी- थेऊर असा मार्गक्रम आहे.

लेण्याद्रीचा गिरिजात्मज


गिरिजात्मज (लेण्याद्री) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकांमधील सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे. कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात १८ गुहा आहेत.
त्यातील ८व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासारठी ३०७ पायरया चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे. हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे. जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना ‘गणेश लेणी’ असे म्हणतात., हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच कुकडी नदी वाहते. या ठिकाणाचा उल्लेख 'जीर्णापूर' व 'लेखन पर्वत' असा झाल्याचे आढळते. पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नांव पडले. आख्यायिका पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात १२ वर्षे तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरूपात प्रकट झाले. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज(पुत्र) म्हणून या गणपतीला 'गिरिजात्मज' हे नांव मिळाले. कसे जावे लेण्याद्रीला जाण्यासाठी पुणे- जुन्नर अंतर ९४ किलोमीटर आहे. पुणे ते जुन्नर एस.टी. बस गाड्या पुण्याच्या शिवाजीनगर बसस्थानकावरून सुटतात. खुद्द जुन्नरहून लेण्याद्री फक्त ४ किलोमीटर आहे. मात्र वाटेत नदी लागत असल्याने खास मोटार करूनच जावे. तसेच जुन्नरहून लेण्याद्रीला जाण्यास एस.टी.ची सोय आहे. हे देवस्थान डोंगरात असून, २८३ पायऱ्या चढाव्या लागतात. वृद्धांना डोलीतून नेण्याची सोय आहे. पुणे- नाशिक हायवे- चाकण- राजगुरुनगर- मंचर नारायणगाववरून जुन्नर रोड असा मार्गक्रम आहे.

महडचा वरदविनायक


वरदविनायक (महड) हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे.अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महाडचा वरदविनायक ओळखला जातो. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते.
मंदिर या देवळाच्या चारही बाजूस चारहत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे.पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे.


 इतिहास हे देऊळ अष्टविनायकांपैकीएक आहे.या मंदिराचा जिर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालिन असून तो हेमांडपंथी आहे. हा गणपती पुरातन कालीन असल्याचे सांगितले जाते.गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा ) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात १६९० साली सापडली. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महाड गावही वसवले. आख्यायिका हे रायगड जिल्ह्यातील अष्टविनायकाचे दुसरे स्थान. महडच्या वरद विनायकाची देवालयाची स्थापना वेदप्रसिद्ध गृत्समद ऋषींनी केली अशी समजूत आहे. हजारो वर्षांपूर्वी हे ऋषी होऊन गेले. या ऋषींनी विनायकाची खडतर तप करून आराधना केली, तेव्हा श्रीविनायक त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि वर माग म्हणाले, गृत्समदाने स्वतःची शुद्धी आणि आपल्या तपश्‍चर्येच्या स्थानी देवाचे कायमचे वास्तव्य या दोन गोष्टी मागितल्या आणि श्रीविनायकाने त्या दोन्ही मान्य करून तो त्या अरण्यात स्थिर झाला. ते अरण्य म्हणजेच महड होय. त्यामुळे या स्थानाला फार महत्त्व आलेले आहे. या देवळातली मूर्ती धोंडू पौडकर नावाच्या एका गणेशभक्ताला तिथल्या तळ्यात सापडली. तसा त्याला दृष्टान्त झाल्याचे म्हणतात. या मूर्तीची त्याने तळ्याजवळच्या ज्या कोनाड्यात स्थापना केली तो अखंड दगडाचा आहे. त्यावर नंतर देऊळ बांधण्यात आले. तेव्हापासून आजतागायत या देवळातला नंदादीप अखंडितपणे तेवत आहे, असे म्हणतात. देवळास पेशव्यांनी बरीच मदत केली आहे. गणपतीच्या पूर्वेस हरिहर गोसावी यांनी जिवंत समाधी घेतली होती. तपश्‍चर्या करण्याकरिता हे स्थान सर्वस्वी अनुकूल आहे. सभोवतालचा परिसर अत्यंत रमणीय आहे. हे मंदिर पूर्वेकडे तोंड करून आहे. देवळाच्या चारी बाजूंना हत्तीच्या दोन दोन मूर्ती कोरलेल्या आहेत. घुमटावर सोनेरी रंगाचा कळस आहे. घुमटावर वरच्या बाजूस नागाची नक्षी आहे. पाठीमागे तळे आहे. आतील बाजूस सभामंडप आहे. दोन्ही बाजूस कोनाड्यात गणपतीच्या दोन मूर्ती आहेत. प्रवेश करताना वरच्या बाजूलाही गणेशाची मूर्ती दिसते. बाहेरच्या बाजूस सभामंडप आहे. दगडी महिरपी नक्षीदार सिंहासनावर ही मूर्ती विराजमान झालेली आहे. या सिंहासनावर दोन हत्ती व मध्ये देवी आहे. मूर्ती दगडी असून, तिची सोंड डावीकडे झुकलेली आहे. अष्टविनायकांपैकी इतर स्थानांप्रमाणेच येथे उत्सव होतात. माघमधील चतुर्थीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात होतो. देवस्थानतर्फे राहण्याची व भोजनाच्या व्यवस्था होऊ शकते. भाडे भरून मंदिरामध्ये जागा वापरावयास मिळते. देवस्थानाला प्रथम छत्रपती शाहू महाराजांनी पहिली सनद करून दिली. कसे जावे मुंबई- पुणे रस्त्याने खोपोली एस.टी. स्थानकाच्या अलीकडे उजव्या हातास महडकडे जाण्याचा फाटा लागतो. एस.टी.ने गेल्यास पुणे-ठाणे गाडीने मुख्य रस्त्यावरच महडच्या फाट्यापाशी उतरावे. पुणे ते महड हे अंतर ८४ किलोमीटर एवढे आहे.

ओझरचा विघ्नेश्वर


विघ्नहर्ता (ओझर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. इतिहास १७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजीआप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला. उत्सव त्रिपुरी पौर्णिमेला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवा व संकष्टी चतुर्थीला लोक दर्शन घेतात. आख्यायिका या अष्टविनायक स्थानी विघ्नासुराने सत्कर्मे करणाऱ्यांना अतिशय पीडा दिली. तेव्हा देवांनी पार्श्‍व नावाच्या ऋषींना पुढे करून या विघ्नासुराचे परिपत्य करण्याकरिता गणपतीची आराधना केली. गणपती पार्श्‍व ऋषींना प्रसन्न झाला तो याच ठिकाणी, असे पुराणात वर्णिले आहे. त्याने पार्श्‍व ऋषींचा पुत्र होऊन विघ्नासुराशी मोठे युद्ध केले व त्याला शेवटी शरण यावयाला लावले. विघ्नासुराने भक्तिपूर्वक गणपतीचे स्तवन करून देवाला विघ्नहर असे नाव घ्यावे अशी विनंती केली आणि गणपतीने ती मान्य केली. विघ्नेश्‍वर या नामाचा जे जप करतील त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील. असे गणपतीने विघ्नेश्‍वराला सांगितले. नंतर देवांनी नैऋत्य दिशेला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्याहकाळी गणपतीची या स्थानी स्थापना केली. तेथील तीर्थात जे स्नान करतात, जे या क्षेत्राची यात्रा करतात ते गणपतीभक्त कृतकृत्य होतात.
सर्व अष्टविनायकांच्या स्थानात हे स्थान अतिशय रमणीय म्हणून प्रसिद्ध आहे. अष्टविनायकात श्रीविघ्नेश्‍वराला फार मोठा मान आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे या गणेशाचे भक्त होते. विघ्ने दूर व्हावीत अशी इच्छा करणाऱ्यांनी या विघ्नहराची उपासना करावी. श्री विघ्नेहराचे देवालय पूर्वेकडे तोंड करून आहे. गाभाऱ्यात चारू बाजूंना छोटे कोनाडे असून, त्यात पंचायतनाच्या मूर्ती आहेत. श्रींच्या डावीकडे भिंतीवर कमलावर आरूढ अशी लक्ष्मी व उजवीकडे श्री विष्णूचे चित्र रेखाटलेले आहे. देवालय चारी बाजूंनी दगडी तटांनी बंदिस्त आहे. मुख्य देवाच्या मूर्तीसमोरच मंडप आहे. देवळाचा घुमट कलात्मक असून त्यावर शिखर व सोनेरी कळस आहे. प्रमुख देवळात शिरताना दोन्ही बाजूंना कोरलेले दगडाचे भालदार चोपदार उभे असलेले दिसतात. देवळाचा दर्शनी भाग कोरीव असून, त्यावर दोन ऋषींच्या मूर्ती कोरल्या आहेत. नदीकडच्या बाजूकडून देवळाकडे येताना प्रथम इनामदारांचा वाडा, नंतर महादेवाचे देवालय आणि नंतर पायऱ्या चढून विघ्नहराच्या मंदिरात येता येते. देवळाच्या समोर धर्मशाळा आहे. श्रीविघ्नेश्‍वराची मूर्ती स्वयंभू आणि पूर्वाभिमुख असून, डाव्या सोंडेची आहे. विघ्नहराची मूर्ती महिरपी डोलदार अशा कमानीत आहे. भाद्रपद व माघ चतुर्थी या दिवशी उत्सव साजरे होतात. मंदिराचा कारभार श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे चालतो. भाविकांसाठी येथे खोल्या बांधलेल्या आहेत. भोजन, निवास आणि धार्मिक विधी यांची व्यवस्था होते. कसे जावे पुणे- नारायणगाव तेथून जुन्ननरला जाताना उजव्या बाजूला ओझरकडे फाटा फुटतो. तेथून ओझर ५ मैल आहे. देवस्थानच्या अलीकडे कुकडी नदीवर आता पूल झाला आहे. एस.टी. बस आहे. ओझर ते नारायणगाव हे अंतर १२ किलोमीटर तर पुणे ते ओझर हे अंतर ८५ किलोमीटर एवढे आहे.

रांजणगावचा महागणपती


महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकातील सर्वांत शेवटचा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो.


मंदिर येथील मूर्तीचे तोंड पूर्वेकडे असून त्याचे कपाळ मोठे आहे.येथीलमूळ मूर्ती सध्याच्या मूर्तीच्या मागे असल्याचे सांगितले जाते. या मूर्तीला 10 सोंड व 20 हात होते. तिला मोहोत्कट असे म्हटले जाते. या मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडती, अशी मंदिराची रचना आहे.रांजणगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असुन मंदिरात दिशासाधन केले आहे.त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यानकाळी गणेशाच्या मूर्तीवर किरण पडतात. मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची व आसनमांडी घातलेली आहे. मुर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला रिध्दी-सिद्धी उभ्या आहेत.दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी व त्या दिवशी या ठिकाणी मुक्त प्रवेश असतो. इतिहास या मं‍दिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे. त्यांनीच या मूर्तीसाठी तळघर बांधले. आख्यायिका रांजणगाव हे दुसरे अष्टविनायकांपैकी स्थान. त्याला गणपतीचे रांजणगाव असे म्हणतात. हे स्थान शिरूर म्हणजे घोडनदीच्या अलीकडे पुण्याजवळ आहे. त्रिपुरासुराने गजाननाकडून वरप्राप्ती झाल्यानंतर सर्व जग पादाक्रांत करण्याचे ठरवून स्वर्गावर स्वारी केली व देवांच्या सैन्याची दाणादाण उडवून स्वर्ग, पाताळ सर्व हस्तगत केले. सर्व जग त्या असुराच्या त्रासाने भयग्रस्त झाले. याला उपाय म्हणून नारदांनी देवांना गजाननाची उपासना करण्याचा उपदेश केला. देवांनी आठ श्लोकयुक्त स्तोत्राने गणेशाची स्तुती केली. ते स्तोत्र संकटनाशनस्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे. शंकरांनी ज्या क्षेत्रात तपश्‍चर्या करून त्रिपुरासुरावर विजय मिळविला ते हे क्षेत्र. येथे त्यांनी मणिपूर नावाचे नगर वसविले तेच हे रांजणगाव. देवालय पूर्वेकडे तोंड करून आहे. देवळात सभामंडप आहे. पेशव्यांच्या पदरी असलेले सरदार पवार व शिंदे यांनी इथल्या ओवऱ्या बांधल्या. देवळाच्या आतला मूर्तीचा गाभारा आणि बाहेरचा गाभारा श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी बांधली आहे.देवळात आज असलेल्या पूजामूर्तीच्या खाली तळघरात दुसरी एक लहान मूर्ती आहे तीच खरी श्रींची मूळमूर्ती. या मूर्तीला १० सोंड व २० हात आहेत असे म्हणतात. या देवळानजीकच एक दुष्काळातही पाणी न आटणारी विहिर आहे. रांजणगाव देवस्थानास मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, यशवंतराव चंद्रचूड इत्यादींकडून इनामे मिळाली होती. पूर्वी भोर संस्थानकडूनही मदत मिळत असे. थोरले माधवराव पेशवे यांनी हा गाव इनाम करून दिलेला आहे. मंदिरात आज पूजेकरिता असणाऱ्या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे. मूर्ती दिसायला सुंदर आहे. आसन मांडीचे आहे. मूर्तीचे कपाळ रूंद आहे. भाद्रपद चतुर्थीला उत्सव फार मोठ्या प्रमाणावर होतो. हा गणपती नवसाला हटकून पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील पुजारी व क्षेत्रोपाध्ये यांच्या मार्फत राहण्याची व भोजनाची व्यवस्था होऊ शकते. कसे जावे पुणे- अहमदनगर रस्त्यावर शिरूर तालुक्‍यात पुण्यापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर हे देवस्थान मुख्य रस्त्याला लागून आहे. येथे जाण्यासाठी तासाच्या अंतराने एस.टी. बसेस आहेत. पुणे- वाघोली- भीमा कोरेगाव- शिक्रापूर- रांजणगाव