Saturday, 27 October 2012

श्री चिंतामणी



श्री चिंतामणी- थेऊर, जि. पुणे मार्ग- पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासुन २२ कि.मी. अंतरावर. लोणी स्थानकापासून ५ कि.मी. यात्रा- भाद्रपद शु. चतुर्थी. रमा-माधव पुण्यतिथी. कार्तिक कृष्ण अष्टमी. मूर्ती- स्वयंभू. उजव्या सोंडेची. मंदिर- महाद्वार उत्तराभिमुख पण मूर्ती पूर्वाभिमुख. प्रशस्त आवार. विस्तृत सभामंडप. तिन्ही बाजूंनी मुळा-मुठेचा वेढा. या मंदिराची व्यवस्था चिंचवड देवस्थानाकडे आहे. इतिहास- मोरया गोसावी यांनी इथेही तप केले. इथेच त्यांना सिद्धी मिळाली. त्यामुळे चिंचवड व थेऊर यांचा परस्पर संबंध आहे. मोरया गोसाव्यांचे पुत्र चिंतामणी देव यांनी इथले मंदिर बांधले. सभामंडप श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला. त्यांचे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई ह्यांचे हे आवडते स्थान होते. श्रीमंत माधवराव पेशव्यांचा मृत्यूही याच क्षेत्रात झाला. मंदिर परिसरातीलच एका ओवरीत, त्या चिंतामणीच्या सान्निध्यात त्यांचा तो अखेरच्या काळातील मुक्काम होता. एकीकडे अनेक वैद्यांचे उपचार सुरू होते, तर दुसरीकडे अभिषेकाची ती अखंड संततधारही चालू होती. गजाननाचा धावा करत अनुष्ठान जप तपास बसलेल्या ब्राह्मणांचा मंत्रोच्चार टिपेच्या स्वरात पोहोचला होता. एवढय़ात.. अभिषेकाची ती धार तुटली आणि तिकडे तो गजाननाचा धावाही! मराठेशाहीचा शूर-कर्तबगार पेशवा अगदी अकाली त्या चिंतामणीच्या पायी चिरनिद्राधीन झाला. श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या जीवनकार्यातील हा अखेरचा प्रसंग! ज्याने आमच्या कर्तबगार, शूर मराठेशाहीला काहीसे भावुक केले आणि अष्टविनायकातील थेऊरलाही एक नवी ऐतिहासिक ओळख बहाल केली. पुण्याहून थेऊर बावीस किलोमीटर. गावापर्यंत पुण्याची शहर बससेवा सतत धावते. निवांत स्थळ, धार्मिक वलय आणि ऐतिहासिक पाश्र्वभूमीने थेऊरला पर्यटक, भाविकांची सतत वर्दळ असते. तीन बाजूने वेढा पडलेल्या मुळा-मुठेच्या कवेत हे छोटेसे गाव वसलेले आहे. गावात आपण येतो तेच चिंतामणीच्या दारात. कधीकाळी हरिपंत फडक्यांनी बांधलेला फरसबंदी मार्गच आजही आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन येतो. मंदिराभोवती तट आहे. या तटातील उत्तराभिमुखी दरवाजातून मंदिर आवारात आपला प्रवेश होतो. चिरेबंदी बांधणीतले मंदिर, पुढय़ात लाकडी, कौलारू सभामंडप आणि मंदिराभोवती तटाला लागून ओवऱ्या अशी या मंदिराची रचना. पैकी मूळ मंदिर मोरया गोसावी यांच्या कुळातील चिंतामणी महाराज देव यांनी चाळीस हजार रुपये खर्चून बांधले. पुढचा लाकडी सभामंडप माधवराव पेशव्यांनी उभारला. मंदिराच्या दारातच एक भलीमोठी घंटा टांगलेली आहे. चिमाजीअप्पांनी वसई विजयोत्सवाची प्रतीके म्हणून लुटून आणलेल्या पोर्तुगिजांच्या घंटांपैकी ही एक. या घंटेवर काही इंग्रजी अक्षरेही दिसतात, पण त्याचा अर्थ लागत नाही. हौसेने ही घंटा वाजवायची आणि सभामंडपात शिरायचे. पेशव्यांनी बांधलेला हा कौलारू-लाकडी सभामंडप आजही सुस्थितीत आहे. या मंडपाच्या मधोमध कारंज्याचा एक हौद आहे. हे कारंजे सध्या बंद आहे. ते सुरू करता आले तर त्याच्या शब्दातील सौंदर्य खऱ्याअर्थाने उमलून येईल. सभामंडपात आल्याबरोबर समोर गाभाऱ्यातील पूर्वाभिमुख डाव्या सोंडेची आसनस्थ चिंतामणीची प्रसन्न मूर्ती दर्शन देते. शेंदूरभारल्या मूर्तीच्या भाळी असलेले ते जास्वंदीचे फूल आणि दूर्वाची जुडी त्याच्या सौंदर्यात भर घालत असते. त्याचे ते क्षणभराचे दर्शनही मन प्रसन्न करून जाते. रमा-माधव स्मृती चिंतामणीचे हे प्रसन्न दर्शन घेऊन भोवताली फिरू लागलो, की तिथल्याच एका ओवरीत ठेवलेली माधवराव पेशव्यांची प्रतिमा थेऊरभोवती घडलेल्या त्या इतिहासात घेऊन जाते. थोरले माधवराव पेशवे यांची थेऊरच्या चिंतामणीवर मोठी भक्ती होती. ते इथे वारंवार दर्शनास येत. यातूनच चिंतामणीचा नित्य सहवास घडावा म्हणून त्यांनी थेऊर गावात स्वत:साठी एक टोलेजंग वाडा बांधून घेतला. तट, बुरूज, महादरवाजा, नगारखाना असलेला हा वाडा अद्याप थेऊर गावात पाहता येतो. येथील यशवंत साखर कारखान्यातर्फे याची निगा राखली जाते. वाडय़ाच्या आतील वास्तू ढासळल्या असल्या तरी तेथील जोत्यावरून त्या वेळेच्या बांधकामाची कल्पना येते. आपल्या अखेरच्या आजारपणातही माधवराव पेशव्यांनी चिंतामणीवरची ही श्रद्धा न सोडता स्वत:ला त्याच्याच हवाली केले. अखेर त्याचाच धावा करत १८ नोव्हेंबर १७७२ रोजी त्यांनी आपला प्राण इथे चिंतामणीच्या दारी सोडला. सारी मराठेशाही दु:खात बुडाली. इथे मुळा-मुठा नदीच्या काठावरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पत्नी रमाबाईदेखील सती गेल्या. मुळा-मुठेच्या काठावरचे हे वृंदावन रमा-माधवरावांच्या या हृद्य आठवणी आजही कवटाळून आहे. दरवर्षी कार्तिक वद्य अष्टमीला इथे माधवराव-रमाबाईंच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होतो. थेऊरला यावे. इथल्या चिंतामणीचे प्रसन्न दर्शन घ्यावे. बरोबरीने हा इतिहास पाहावा. जमले तर जुन्या थेऊरमधील लक्ष्मी आणि महादेवाची प्राचीन मंदिरे पाहावीत. इथला साखर कारखाना बघावा. इथले गोड पेरू खावेत आणि आपल्या मुशाफिरीच्या आठवणीत आणखी एक स्थळ जोडावे.

No comments:

Post a Comment