Saturday 27 October 2012

अष्टविनायका तुझा महिमा कसा

भारतात जशी शंकराची बारा ज्योतिर्लिंगे प्रसिद्ध आहेत तसेच महाराष्ट्रातील अष्टविनायक भाविकांच्या मनात एक वेगळेच स्थान मिळवून आहेत. हिंदू धर्मात कोणतेही कार्य करण्याअगोदर गणेशाला वंदन करूनच सुरू केले जाते. तो विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता आणि मंगलमूर्ती आहे. त्यामुळेच कोणत्याही छोट्या मोठ्या गावांत जा, तेथे गणपती मंदिर असणारच. देशात कांही गणपती मंदिरे वैशिष्ठ्यूपूर्णही आहेत मात्र अष्टविनायकानी आपले एक वेगळेच महत्त्व सिद्ध केले आहे. हे अष्टविनायक स्वयंभू आहेत म्हणजे या मूर्ती निसर्गानेच निर्माण केलेल्या आहेत असा समज आहे तसेच हे सर्व विनायक जागृत म्हणजे भाविकांना पावणारे आहेत असाही विश्वास भाविकांत आहे. अष्टविनायकांची ही स्थाने महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि रायगड अशा तीन जिल्ह्यातच आहेत. अनेक भाविक अष्टविनायकाची यात्रा करत असतात. मात्र या यात्रेचे कांही नियम आहेत. त्यानुसार मोरगांवच्या मयुरेश्वराचे प्रथम दर्शन घ्यावे लागते. त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगांव व परत मोरगांव अशा क्रमाने ही यात्रा केली तरच ती शास्त्रशुद्ध होते.


मोरगांवचा मयुरेश्वर-
अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर. पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील कर्‍हा नदीच्या काठी वसलेल्या मोरगांव या छोट्याशा गावांत हे मंदिर असून दूरून एखाद्या किल्ल्याप्रमाणे हे मंदिर दिसते. मयुरेश्वर म्हणजे मोरावर आरूढ झालेला. गणपतीचे वाहन मूषक असले तरी हा गणपती मोरावर विराजमान आहे. तीन डोळे असलेली ही मूर्ती बैठी असून डाव्या सोंडेची आहे. गणपतीच्या डोळ्यात व नाभीत मौल्यवान रत्ने बसविलेली आहेत. डोक्यावर नागराजाची फडा आहे. दोन्ही बाजूस रिद्धी सिद्धींच्या मूर्ती आहेत. मूर्तीवर शेंदूराचे कवच असल्याने मूर्ती मोठी वाटली तरी प्रत्यक्षात छोटी आहे. दर १००-१५० वर्षांची हे कवच निघते.

मंदिरात मुख्य दाराने प्रवेश केला की प्रथम भव्य दिपमाळ आहे, नगारखाना आहे. मंदिरात गेल्यावर दिसतो दगडी मूषक किवा उंदीर. याने पुढच्या दोन पायात लाडू पकडलेला आहे. पायर्‍या चढून वर गेल्यानंतर दिसतो भव्य नंदी. असे सांगतात की येथून जवळच असलेल्या शिवमंदिरात नेण्यासाठी हा नंदी बैलगाडीतून नेला जात होता मात्र मयुरेश्वराच्या मंदिरासमोर आल्यावर गाडी मोडली आणि नंदी खाली पडला. त्यानंतर अनेक जणांनी उचलूनही हा नंदी हलेनाच. रात्री गाडीवानाच्या स्वप्नात हा नंदी आला आणि त्याने याच मंदिरात त्याला राहायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे गणपतीमंदिरातच नंदी बसविण्यात आला.

हे मंदिर बिदरच्या बादशहाच्या दरबारात असलेले सरदार गोळे यांनी बांधल्याचे दाखले आहेत. मात्र मोगली आक्रमणापासून सुरक्षा मिळावी म्हणून दूरून मशिदीचा भास व्हावा अशा पद्धतीने हे मंदिर बांधले गेले आहे. मंदिराला चार दरवाजे असून पूर्व दरवाजात लक्ष्मीनारायण, पश्चिम दरवाज्यात रती आणि काम, दक्षिण दरवाजात शिवपार्वती तर उत्तरेच्या दरवाजात पृथ्वी आणि सूर्य आहेत. मंदिराच्या आठ कोपर्‍यात आठ गणपती असून ते एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विघ्नराज, धुम्रवर्ण, वक्रतुंड या स्वभाववैशिष्ट्यांनी युक्त आहेत. मंदिरात शमी, मंदार आणि तराटीचा वृक्ष असून तराटीला कल्पवृक्ष असेही म्हटले जाते. याच झाडाखाली बसून ध्यानधारणा केली जाते. मयुरेश्वराचे दर्शन घेण्याअगोदर नंगा भैरव दर्शन घेण्याची प्रथा असून मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या या भैरवाला गुळ, नारळाचा नैवैद्य दाखविला जातो.

पुण्यापासून ५५ किमीवर असलेल्या मोरगांवात पूर्वी मोर मोठ्या संख्येने होते असे सांगतात तसेच या गणपतीची मूर्ती प्रत्यक्ष बह्माने बसविली होती असाही समज आहे. सध्याच्या मूर्तीमागे तांब्याच्या कवचात वाळू, लोखंड आणि हिरे यांच्या चूर्णातून बनविलेली मूर्ती पांडवांनी बसविलेली आहे असेही सांगितले जाते.



स्वस्ती श्री गणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धीद्म्
बल्लाळम् मुरुडम् विनायक महडम् चिंतामणीम् थेवरम्
लेण्याद्रीम् गिरीजात्मजम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम्
ग्रामो रांजण संस्थितो गणपती: कुर्यात सदा मंगलम्
कुर्यात सदा मंगलम्

जय गनपती गुनपती गजवदना (२)
आज तुझी पुंजा देवा गौरीनंदना
जय गनपती गुनपती गजवदना

कुडी झाली देऊळ छान, काळजात सिंहासन
काळजात सिंहासन
मधोमधी गजानन
दोहीकडी रिद्धीसिद्धी उभ्या ललना
जय गनपती गुनपती गजवदना

अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
अष्टविनायका तुझा महिमा कसा

गनपती, पहिला गनपती, आहा
मोरगावचा मोरेश्वर लई मोठ मंदिर
[अकरा पायरी हो, अकरा पायरी हो ]
नंदी कासव सभा मंडपी नक्षी सुंदर
[शोभा साजरी हो, हो शोभा साजरी हो]

मोरया गोसाव्यानं याचा घेतला वसा .१

गनपती, दुसरा गनपती, आहा
थेऊर गावचा चिंतामनी
कहाणी त्याची लई लई जुनी
काय सांगू, आता काय सांगू
डाव्या सोंडेच नवाल केल सार्‍यांनी, हो सार्‍यांनी
विस्तार ह्याचा केला थोरल्या पेशवांनी, हो पेशव्यांनी
रमाबाईला अमर केल वृंदावनी, हो वृंदावनी
जो चिंता हरतो जगातली त्यो चिंतामनी

भगताच्या मनी त्याचा अजुनी ठसा ..२

ग न प ती, तिसरा ग न प ती
ग न प ती, तिसरा ग न प ती
शिद्दीविनायक तुझा शिद्दटेक गाव रं
पायावरी डोई तुज्या भगताला पाव रं
दैत्य मधु-कैतभान गांजल हे नग्गर
ईस्नुनारायन गाई गनपतीचा मंतर
राकुस म्येल नवाल झाल
ट्येकावरी देऊळ आलं
लांबरुंद गाभार्‍याला पितळंच मखर
चंद्र सुर्य गरुडाची भवती कलाकुसर

मंडपात आरतीला खुशाल बसा ...३

गणपती, गणपती गं चवथा गणपती
बाई, रांजणगावचा देव महागणपती
[बाई, रांजणगावचा देव महागणपती]
दहा तोंड ईस हात जणु मुर्तीला म्हणतीबाई,
[दहा तोंड ईस हात जणु मुर्तीला म्हणती]
बाई, रांजणगावचा देव महागणपती
गजा घालितो आसन, डोळं भरुन दर्शन
सुर्य फेकी मुर्तीवर येळ साधुन किरण
किती गुणगान गाव, किती करावी गणती
बाई, रांजणगावचा देव महागणपती

पुण्याईच दान घ्याव ओंजळ पसा ....४

गणपती पाचवा, पाचवा गणपती
ओझरचा विघ्नेश्वर, बाई ओझरचा विघ्नेश्वर
लांबरुंद हाये मुर्ती
जडजवाहिर त्यात
काय सांगू शिरीमंती
ओझरचा विघ्नेश्वर, बाई ओझरचा विघ्नेश्वर
डोळ्यामंदी मानक हो, बाई डोळ्यामंदी मानक हो
हिरा शोभतो कपाळा
तानभुक हारते हो, सारा पाहुन सोहाळा
चारी बाजु तटबंदी
मधे गनाच मंदिर
ओझरचा विघ्नेश्वर

ईघ्नहारी, ईघ्नहर्ता स्वयम्भू जसा .....५

गनपती, सहावा गनपती
(हो....हो...)
लेण्याद्री डोंगरावरी
नदीच्या तीरी, गणाची स्वारी
तयाला गिरीजत्मज हे नाव
दगडामंदी कोरलाय भक्तीभाव
रमती ईथे रंकासंगती राव हो जी जी
(रमती ईथे रंकासंगती राव हो जी जी..)

शिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला हो जी जी
(शिवाचा झाला हो जी जी, शिवाचा झाला हो जी जी)
लेन्याद्री गनानं फाटे आशीर्वाद केला हो जी जी
(आशीर्वाद केला हो जी जी, आशीर्वाद केला हो जी जी)
पुत्रानं पित्याला जल्माचा परसाद द्येला हो जी जी
(परसाद द्येला हो जी जी, परसाद द्येला हो जी जी)
किरपेनं गनाच्या शिवबा धावूनी आला हो जी जी
(धावूनी आला हो जी जी, धावूनी आला हो जी जी)

खडकात केल खोदकाम
दगडाच मंदपी खांब
वाघ, शिंव, हत्ती लई मोटं
दगडात भव्य मुखवट

गनेश माजा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
अन् गिरीत्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
(जी जी हो जी जी, हं जी जी रं जी जी, हे हे हे हां)

अहो दगडमाती रुप द्येवाच लेण्याद्री जसा ......६

सातवा गनपती राया, सातवा गनपती राया, सातवा गनपती राया हे हे हे हे हे हो हा
महडगावं अति महाशूर
वरदविनायकाच तिथं येक मंदिर
मंदिर लई सादसुद, जस कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी
नक्षी नागाची कळसच्या वर, कळसाच्या वर....
(हे हे हे हे हां)

स्वप्नात भक्ताला कळ
देवच्या माग हाय तळ
मुर्ती गनाची पाण्यात मिळ
त्यान बांधल तिथ देऊळ

दगडी महिरप सिंहासनी या, प्रसन्न मंगल मुर्ती हो
वरदानाला विनायकाची पुजा कराया येती हो जी जी रं जी
(माज्या गना र जी जी, माज्या गना र जी जी)
हे हे हे हे हे हो हा

चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा, अहो चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा .......७

आठवा आठवा गणपती आठवा
गणपती आठवा हो गणपती आठवा
पाली गावच्या बल्लाळेश्वरा
आदीदेव तू बुध्दीसागरा
स्वयंभू मुर्ती पुर्वाभिमुख
सुर्यनारायण करी कौतुक
डाव्या सोंडेचे रुप साजीरे
कपाळ विशाळ, डोळ्यात हिरे
चिरेबंद ह्या भक्कम भिंती
देवाच्या भक्तीला कशाची भिती
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा ........८

अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
(हो, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा)

मोरया मोरया मंगलमुर्ती मोरया
मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया
मोरया मोरया चिंतामणी मोरया
मोरया मोरया सिध्दीविनायक मोरया
मोरया मोरया महागणपती मोरया
मोरया मोरया विघेश्वरा मोरया
मोरया मोरया गिरीजत्मजा मोरया
मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया
मोरया मोरया अष्टविनायक मोरया
मोरया मोरया अष्टविनायक मोरया
गायक/गायिका:
जयवंत कुळकर्णी, अनुराधा पौडवाल, शरद जांभेकर, चंद्रशेखर गाडगीळ आणि इतर
संगीतकार:
अनिल -अरुण
गीतकार:
जगदीश खेबुडकर
चित्रपट:
अष्टविनायक
अधिक टिपा:
प्रत्येक कडव्यातील कलाकारः मोरगावः कृष्णकांत दळवी थेऊरः चंद्रकांत सिध्दटेकः अशोक सराफ रांजणगावः उषा चव्हाण ओझरः आशा काळे लेण्याद्री: सुधीर दळवी महडः रविंद्र महाजनी पाली: शाहू मोडक, जयश्री गडकर